प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न
आरोग्याच्या सेवासुविधा वाढविण्यावर भर देवू
- पालकमंत्री नवाब मलिक
परभणी, दि.26 :- आजवर विकासाच्या संकल्पनेत जेवढे प्राधान्य आरोग्य सेवा सुविधाला दिल्या गेले त्यात अधिकची भर आणि दक्षता घेण्याची गरत काळाने दाखवून दिली. ही गरज लक्षात घेवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा आणि शासकीय रुग्णालय अद्ययावत करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. याच दृष्टीने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारावे या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, खासदार संजय जाधव, खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदिंची उपस्थिती होती.
देशातील जनतेने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडल्याने लोकशाही यशस्वी होण्यास मदत झाली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात एक नवीन योजना आखून त्यांना न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय बनावटीची कोरोना लस ही अत्यंत सुरक्षित असून कुठल्याही अफवांना बळी पडू नये, तसेच कोरोनापासून आपला व कुटुंबातील सदस्याचा बचाव करण्यासाठी कोरोना लस सर्वांनी टोचून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी जिल्हावासीयांना उद्देशून केले.
कोव्हिड-19 च्या काळात परभणी जिल्हा प्रशासनाने विशेष कामगिरी केली ती कामगिरी कौतुकास्पद आहे असे सांगून आता कोव्हिड-19 वर नियंत्रण मिळविण्यात बऱ्याच प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वकपणे पार पाडावी. जिल्ह्यातील विकासाची कामे करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेतील सुधारणा करून अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच आगामी काळात राज्य शासनामार्फत परभणी शहरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा निर्णय निश्चित होईल अशी नि: संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना न्याय व सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्धीसाठी नवे पाऊल उचलू असे नवीन योजनेबाबत संकेतही त्यांनी दिले. कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने रहा व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी -कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलिस दल, गृहरक्षक दल, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, यांनी परेड संचालनातून मानवंदना दिली तसेच कोव्हिड लसीकरण मोहीम, आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, महिला व बालविकास या विभागांनी देखाव्यावर चित्ररथ सादर केले. यावेळी कोविड यौध्दा म्हणून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टर, पोलीस, महापालिका आदि विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्या पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री श्री.मलिक यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहन
परभणी येथील प्रशासकीय इमारतीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, श्री.पौळ यांच्यासह इमारत परिसर कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
–––––
गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गाव निर्माण होतात
- पालकमंत्री नवाब मलिक
परभणी, दि.26 :- सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न झाला. गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गांव निर्माण होतात असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
या कार्यक्रमास आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, तहसिलदार डॉ. संजय बिरादार, नायब तहसिलदार रामदास कोलगणे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद देशमुख, किरण सोनटक्के यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, गावकऱ्यांनी गावात एकोपा ठेवल्यास आदर्श गाव निर्माण होतात. सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे येथील सर्व ग्रामस्थाचे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करुन माझे गाव सुंदर गाव यामध्ये सहभागी होवून गांव स्वच्छ व सुदर बनवावे तसेच गाव हगणदारी मुक्त करण्याबाबत पुढाकार घ्यावा या कामाध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू तसेच प्रशासन ही आपणास सहकार्य करेल असे आश्वासित केले. गावातील युवक तरुणांनी ठरविल्यास गावाचा विकास होवून गावाच कायापालट होईल. ग्रामपंचायतीना थेट निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडेल तसेच या गावचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश झाला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी उत्तम काम करुन गावाचा विकास करावा असे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांनी वृक्षारोपन केले.
आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोन्ना गावात विविध विकासात्मक उपक्रम होतात तसेच या गावामध्ये लोकसहभागामधून पानदन रस्त्याचे अनेक कामे झाली आहेत असे सांगून सोन्ना गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित कामाची व नविन प्रस्तावित कामाची माहिती करुन देवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी डॉ. शाम गमे यांनी गावाच्या समस्या व भविष्यात करावयाच्या कामाची माहिती प्रास्ताविकातून सादर केली. या कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव गमे, सुधाकर कोंडरे, गणेश टोगराज, गजानन गमे, तारामती दंडवते, लक्ष्मीबाई गादेवाड, सुवर्णमाला सुर्यवंशी, सिमा कदम, संजीवनी देशमुख, ग्रामसेवक ए. बी. दुधाटे तसेच मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.