व्यापा-यांनो कोरोनाची`आरटीपीसीआर’चाचणी करा अन्यथा दुपारनंतर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत…

Spread the love

व्यापा-यांनो कोरोनाची`आरटीपीसीआर’चाचणी करा अन्यथा दुपारनंतर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत…..
परभणी महापालिकेचे आवाहन…

परभणी/प्रतिनिधी
व्यापारी, कामगारांनी तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी अन्यथा दुपारी दोन नंतर दुकाने उघडता येणार नाहीत, असा इशारा महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता.16) सकाळी मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांना दिला.
कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील नागरी भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येस आळा बसावा, संसर्गास अटकाव करण्यासाठी शासकीय, खासगी अस्थापनेतील अधिकारी, कर्मचार्‍यांसह व्यापारी, मालक, कामगार, व्यापारी, फळ विक्रेते, चिकन, मटन, अंडी, दुध, भाजीपाला विक्रेते, रिक्षा चालकांनी मंगळवारपर्यंत (ता.16) आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. मात्र, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामागारांसह अन्य घटकांकडून यास फारच थंड प्रतिसाद मिळत असल्याने सोमवारी (ता.15) जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केली नाही तर कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश बजावले होते.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात महापालिका कर्मचार्‍याकडून व्यापार्‍यांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याबाबत ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात येत होते. त्याचबरोबर ज्या व्यापार्‍यांनी आरटीपीसीआर चाचणी केली नाही, त्यांना मंगळवारी दुपारी दोन नंतर व्यवहार करता येणार नसल्याचेही महापालिका कर्मचारी ध्वनिक्षेपकावरून सांगत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, महापालिकेने व्यापारी व कामगारांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या केंद्रावर मोठी रांग दिसून आली. चाचणी करण्यासाठी व्यापारी तेथे स्वयंस्फूर्तीने आल्याचेही दिसून येत होते.

You cannot copy content of this page