परभणी बंदला हिंसक वळण;शहरात कर्फ्यु
संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरण;आंदोलनकर्त्यां कडून ठिकठिकाणी जाळपोळ
परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरच्या संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले असुन,बंद दरम्यान ठिक ठिकाणी रास्तारोको ,करण्यात आले. दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. शहरात ठिक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जमावबंदीचे आदेश काढले आहेत. शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. टेलिफोन, एसटीडी, भ्रमनध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स, ध्वनीक्षेपक, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत.
परभणी बंद आंदोलना दरम्यान स्टेशन रोड परिसरात आंदोलनकर्ते व पोलिस आमने – सामने झाले.पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात जमावबंदी(कर्फ्यु)चे आदेश लागु केले आहेत. आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी परभणी बंदची हाक दिली होती. सकाळच्या सुमारास ठिक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२.३० नंतर परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी ठिक ठिकाणी दगडफेक केली. जाळपोळीच्या घटना घडल्या. बसस्थानक परिसरात तोडफोड करत फळांचे गाडे डिग्गी नाल्यात टाकण्यात आले. औषधी दुकान व इतर दुकानांचे काच फोडण्यात आले. स्टेशनरोड, आर.आर. टावर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागात वाहने फोडण्यात आली. काही वाहने जाळण्यात आली. स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते, पोलिस आमने – सामने आले. यावेळी दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना करण्यात आले आहे.