परभणी पोलीसांकडून घरफोडी करणार्या टोळीचा पर्दाफाश
परभणी,ता.६(प्रतिनिधी)
जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला असून चार गुन्हयांची उकल करत जिंतूर येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीस ४० हजार रूपयांच्या मुद्देमालासहीत ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसांत परभणी जिल्हयात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झााली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिंतूर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने घरफोडीच्या गुन्हयाच्या आरोपींचा शोध घेत असतांना इस्माईल शेख (वय१९ रा.करंजी ता.वसमत जि.हिंगोली) यासह वसमत रेल्वे स्टेशन परिसरात राहत असलेल्या त्याच्या साथीदाराच्या माहितीवरून सापळा रचून पकडले. यावेळी त्याच्या साथीदाराने जिंतूर पोलीस ठाण्यात, कोतवाली पोलिस ठाण्यात, नानलपेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती दिली. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे व नानलपेठ पोलिस ठाणे येथील गुन्हेगारीतील मुद्देमाल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी जिंतूर पोलिस ठाणे येथे आणण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरिक्षक गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंग परिहार, अंमलदार सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, विलास सातपुते, मधुकर ढवळे, रंगनाथ दुधाटे, हनुमान ढगे, परसराम गायकवाड, कांगणे आणि सायबर पोलिस ठाण्याचे बालाजी रेड्डी व गणेश कौटकर यांनी मिळून केली.