पुर्णेत वर्षावास समारोप चैत्य भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन-आ.सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती

Spread the love

पूर्णा ता.५(प्रतिनिधी);शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक बुद्धविहारात दिनांक ७ ऑक्टोबर, मंगळवार रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी वर्षावास समारोप, कठिण चिवरदान, संघदान तसेच स्मृतिशेष उपाली थेरो यांच्या चैत्याचे भूमीपूजन व धम्मदेशना होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा हे विराजमान राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आ. सिद्धार्थ खरात (लोणार – मेहकर विधानसभा), जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण (परभणी), भिमराव सावदकर, प्रा. प्रदीप रोडे (बीड), डॉ. अनंत सूर्यवंशी यांच्यासह बौद्ध भिक्खुसंघातील प्रमुख भिक्खु उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यात भिक्खु पंयारत्न थेरो (नांदेड), भिक्खु पंयाबोधी थेरो (नांदेड), भिक्खु महाविरो थेरो (काळेगाव, अहमदपूर), भिक्खु धम्मशिल थेरो (बीड), भिक्खु शिलरत्न थेरो (नांदेड), भिक्खु बोधीधम्मा, भिक्खु पंयावत, भिक्खु पंयावंश, भिक्खु पंयासार आदींचा सहभाग राहणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

  • पहाटे ५:३० वा. परित्राण सूत्रपठण
  • सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भिक्खु संघासह उपासकांना सामूहिक भोजनदान
  • दुपारी १ वा. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात – भिक्खु संघाचे स्वागत, धम्मदेशना व चैत्याचे भूमीपूजन सोहळा

या भव्य धार्मिक सोहळ्यास शहरातील तसेच परिसरातील उपासक, आसिक, महिला मंडळ व सर्व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती व शहर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page