पूर्णेत ठाकरेसेनेची सरशी;पंचायत समिती त्रिशंकू

Spread the love

६ ठाकरे सेना,५ भाजप,३ अपक्ष,२ राष्ट्रवादी ,२ यशवंतसेना

पूर्णा, ता.९ (प्रतिनिधी) :

तालुक्यात जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद सर्कलमध्ये ६ पैकी ३  तर पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ३ जागी आपल्या विजयी झेंडा फडकावला आहे.तर उर्वरित ३ जागेवर भाजप , राष्ट्रवादी व अपक्षाने प्रत्येकी एक जागा पटकावली आहे.पंचायत समितीच्या १२ गणांसाठीच्या निवडणुकीत भाजपला ४, ठाकरेसेनेला ३, राष्ट्रवादीला १, यशवंत सेनेला २ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या. त्यामुळे पंचायत समितीत स्पष्ट बहुमत कोणालाही न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या आहेत.

      पूर्णा तालुक्यातील जि.प. व पंचायत समितीच्या एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार माधवराव बोथिकर, ना.त. प्रशांत थारकर आणि पंढरीनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

     जि.प.निकालानुसार एरंडेश्वर गटात ठाकरेसेनेचे रितेश काळे यांनी ३२३ मतांनी स्मिता कदम यांचा पराभव केला.एकतर्फी झालेल्या चुडावा गटात भाजपचे भरत घनदाट यांनी राष्ट्रवादीचे अशोक धुतराज यांचा ४ हजार ८३० मतांनी पराभव केला. बहुचर्चित कावलगाव गटात सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष अर्चना ढगे यांनी भाजपच्या उज्वला नागेश्वर यांना ७७७ मतांनी मात दिली. गौर गटात राष्ट्रवादीच्या कोमल पारवे यांनी यशवंत सेनेच्या गयाबाई माटे यांचा ३८७ मतांनी पराभव केला. ताडकळस गटात ठाकरेसेनेच्या केशरबाई जल्हारे यांनी भाजपच्या केदार स्वामी यांचा १ हजार ३९६ मतांनी पराभव केला, तर वझुर गटात ठाकरेसेनेच्या बेबीताई कुकर यांनी भाजपच्या उर्मिला बनसोडे यांच्यावर १ हजार ६७८ मतांची आघाडी घेत विजय मिळविला.

पंचायत समितीच्या निकालात एरंडेश्वर गणात ठाकरेसेनेच्या कान्होपात्रा चापके, आहेरवाडी गणात भाजपच्या शकुंतला बोबडे, चुडावा गणात भाजपच्या प्रियंका गच्चे, देगाव गणात राष्ट्रवादीचे विलास गिरी विजयी झाले. कावलगाव गणात अपक्ष उज्ज्वला पिसाळ, धानोरा मोत्या गणात अपक्ष मीरा खैरे यांनी बाजी मारली.गौर व धनगर टाकळी गणात यशवंत सेनेचे नरेश जोगदंड व गोविंद सूर्यवंशी विजयी झाले. ताडकळस गणात ज्ञानोबा, फुलकळस गणात ठाकरेसेनेचे काशीनाथ काळबांडे, वझुर गणात ठाकरेसेनेचे चंद्रकांत पवार तर देऊळगाव दुधाटे गणात भाजपच्या प्रभावती दुधाटे विजयी झाल्या.

दरम्यान, गौर जि. प.गटात पराभूत उमेदवार गयाबाई माटे यांनी दाखल केलेला फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आला.निर्वाचन अधीकारी प्रतिभा गौर यांच्या हेकेखोर पणामुळे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान यादीवर नसलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारने, पत्रकारांना इमारतीबाहेर थांबविण्यात आल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मतमोजणीसाठी उपस्थित कर्मचारी, पोलीस व प्रतिनिधींना सुमारे सात तास चहा-पाण्याविना थांबावे लागल्याने कर्मचाऱ्यांत चर्चा होती.

    निकाल जाहीर होताच तहसील कार्यालय परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.या काळात उप.वि.पो.अधीकारी डॉ.समाधान पाटील,पो.नि. विलास गोबाडे,सपोनि. सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

You cannot copy content of this page