पूर्णा नदीपात्रात पोलीसांची रेड;वाळूचा टिप्पर पकडला

Spread the love

नांदगाव शिवारातील घटना;५ लाखांचा मुद्देमाल जप्त;चालक मालकांवर गुन्हा दाखल

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)

परभणी स्थानिक गुन्हा शाखा व पुर्णा पोलीसांच्या पथकाने हद्दीतील मौजे नांदगाव शिवारातील नदीपात्रात अवैध वाळू उपस्यावर रेड घालत, घटनास्थळांवरून रेतीने खचाखच भरलेला एक टिप्पर पकडून पुर्णा पोलीस ठाण्यात रेती तस्कर वाहन चालक मालकांवर वाळू चोरीच्या गुन्ह्यासह गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे नांदगाव शिवारातील पुर्णा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करुन चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने पो.नि.विवेकानंद पाटील,पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखेचे पोउपनि चंदनसिंह परीहार, पोहेकाॅ.रंगनाथ दुधाटे, पोहेकाॅ. भदरगे, पोना. क्षिरसागर पोशि.हनुमान ढगे यांच्या सह पुर्णा पोलीस ठाण्याचे फौजदार श्रीनिवास पडलवार,पोशि. टाकरस,पोशि.शेंबेवाड यांचे पथकाने शुक्रवारी २० रोजी मध्यरात्री पासून नांदगाव येथील नदीपात्रात सापळा रचला. शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे एम.एच.०४/बियु/७८०१ या टिप्पर मध्ये वाळू भरत असताना पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली परंतु पोलिसांना पाहताच वाहन चालक व मालक घटनास्थळावरून वाहन सोडून पसार झाले. पोलीसांनी एक लाल रंगाचा टिप्पर तसेच वाळू असा ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुर्णा पोलीस ठाण्यात स्था.गु.शाखेचे हनुमान ढगे यांच्या फिर्यादीवरून टिप्परचा चालक व मालकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पुर्णा पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page