Parbhani Winds जिल्ह्यात गावपातळीवर डिजिटल हवामान दर्शन बोर्ड बसवा-निखिल धामणगावे(काँग्रेस IT Cell जिल्हाध्यक्ष)
परभणी ता.१४(प्रतिनिधी). स्वयंचलित हवामान केंद्रांमधील (AWS) माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर मिळावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरांवर डिजिटल हवामान दर्शन बोर्ड बसवण्यात यावेत अशी मागणी परभणी काँग्रेस( IT Cell)चे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधीकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र शासनाच्या ‘WINDS’ या प्रकल्पांतर्गत परभणी जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येत आहेत. या केंद्रांमधून पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग अशा हवामानाशी संबंधित महत्वाची माहिती नोंदवली जाते. मात्र, सध्या ही माहिती फक्त ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असून गावातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला थेट व वेळेवर मिळत नाही.शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळाल्यास पेरणी, पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग याबाबतची माहिती थेट पाहता येईल, फवारणी, पिकांचे नियोजन, विमा दावे, तसेच कृषी उत्पन्नाशी संबंधित इतर महत्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेणे शक्य होईल. तसेच चक्रिवादळ, गारपीट, बर्फवृष्टी, दुष्काळ, थंडीची लाट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून होणारे नुकसान टाळण्यासाठी देखील ही माहिती उपयुक्त ठरेल, असे जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पांडुरंग कदम आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












