परभणी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष आज निवड
महायुती की मविआ? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
परभणी, ता.१८ (प्रतिनिधी) : परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड आज बुधवारी (ता.१८) पार पडत असून, या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे. महायुती आणि मविआ यांच्यातील सत्तासमीकरणांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाशी सुत जुळवणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी २ वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, पिठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने या पदासाठी विविध पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद तसेच शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत राष्ट्रवादीची वाढती जवळीक यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. भाजपने २४ जागांवर विजय मिळवूनही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “राष्ट्रवादीशिवाय भाजपचा अध्यक्ष होईल” असा दावा केल्याने महायुतीत खळबळ उडाली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, शिवसेना (शिंदे गट) ५, शिवसेना (उबाठा) ६, काँग्रेस ३ आणि १ अपक्ष असे एकूण ३० सदस्य गेल्या काही दिवसांपासून एकत्र सहलीवर असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता.मंगळवारी मुंबईत महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर भाजपचा अध्यक्ष व राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अशी फॉर्म्युला जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम क्षणी कोणता निर्णय घेते, यावर संपूर्ण समीकरण अवलंबून राहणार आहे.
जर राष्ट्रवादीने भाजपसोबत तडजोड केली, तर भाजपकडून भरत घनदाट किंवा लता वाकळे यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. तर मविआसोबत राष्ट्रवादीचा घरोबा झाल्यास शिवसेनेच्या सावंत यांची अध्यक्षपदी वर्णी लागू शकते.आज दुपारी २ नंतर या सगळ्या राजकीय घडामोडींवर पडदा पडणार असून, जिल्हा परिषदेवर नेमकी कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.










