परभणी जि.प.च्या अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विटेकर बिनविरोध

Spread the love

शिवसेना शिंदे गटाचा निवडणूकीवर बहीष्कार

परभणी,दि.१८(प्रतिनिधी) :

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपच्या सौ.लता विजय वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ऐनवेळी घात झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक आज १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली. ही बैठक पिठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.नवनिर्वाचित सदस्यांच्या या बैठकीत अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणार्‍या अध्यक्षपदाकरीता भाजपाच्या श्रीमती वाकळे तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादीचे विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारी मुंबईतून महायुतीतीलच भाजपाचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या सदस्याची उपाध्यक्षपदी निवड होईल, असे जाहीर केले होते. त्यामुळेच या दोन पदांकरीता गेल्या काही दिवसांपासून सुरु असणार्‍या घडामोडींना पूर्णविराम मिळाला होता.व या दोघांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.आज निवडी संबंधीच्या बैठकीत महायूतीतील या दोन्हीही पक्षातील दोघांचे प्रत्येकी एकच उमेदवार अर्ज दाखल झाले . त्यामुळे या दोघांची निवड बिनविरोध होणार हे निश्चितच झाले. दोन वाजता या संदर्भातील निवड अधिकृत रित्या जाहीर केली.

जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेचा संकल्प केला होता.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपला सोडून शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, काँग्रेस व अपक्षा सोबत सत्तेचे गणित जुळवत सदस्यांना सहलीला पाठवले होते.मात्र ऐनवेळी भाजपच्या पक्ष नेतृत्वाने मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या गळाला लावत आपल्या सत्तेचा मार्ग मोकळा केला.

२४ सदस्य संख्या असलेल्या भाजपने लता वाळके तर १५ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीकांत विटेकर यांना उपनगराध्यक्षपदावर विराजमान केले आहे.

बुधवारी सत्ता स्थापनेसाठी भाजप राष्ट्रवादीचे सदस्यांनी आपले अर्ज दाखल केले.यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडीवर बहीष्कार घातला.यानंतर शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी महायुतीच्या घटक पक्षाने पाठीत खंजीर खुपसला असल्याची जळजळीत टीका केली. तर काँग्रेस व शिवसेना उबाठाने विरोधात राहणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page