परभणी जिल्हा परिषदेत भाजपाची ऐतिहासिक मुसंडी;
२४ जागांवर कमळ;राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, उबाठा-शिवसेना-काँग्रेसची घसरण
परभणी,ता.१०(प्रतिनिधी):
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत इतिहासात प्रथमच भाजपाने ५४ पैकी तब्बल २४ गटांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. यासोबतच चार पंचायत समित्यांवर स्पष्ट बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग भाजपासाठी मोकळा झाला असून, अध्यक्षपदही भाजपाकडे जाण्याची शक्यता बळावली आहे.

परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीकडे २४ जागा होत्या, तर शिवसेना १२, काँग्रेस ६, भाजप ५, रासप ३, मित्रमंडळ १ आणि अपक्ष १ असे बलाबल होते. मात्र २०२६ च्या निवडणुकीत मतदारांनी वेगळा कौल दिला असून, राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
नवीन निकालानुसार भाजप २४ जागांसह अव्वल स्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, उबाठा ६, शिवसेना ५, काँग्रेस ३ तर अपक्ष १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे राष्ट्रवादीची संख्या घटली असून, उबाठा, शिवसेना आणि काँग्रेस यांची लक्षणीय पिछेहाट झाल्याचे दिसून येते.
पंचायत समितीच्या निकालातही भाजपाने आपली ताकद सिद्ध केली आहे. जिंतूर, सेलू, पालम आणि गंगाखेडया चार पंचायत समित्यांवर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर सोनपेठ आणि मानवत येथे राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले आहे. पाथरी, परभणी व पूर्णा पंचायत समित्यांमध्ये मात्र संमिश्र कौल लागल्याने तेथे सत्ता स्थापनेसाठी पक्षीय समन्वयाची गरज भासणार आहे.
पंचायत समिती सदस्यसंख्येचा विचार करता भाजप ४७ सदस्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी ३३, उबाठा ९, शिवसेना ७, काँग्रेस ६, यशवंत सेना २ तर अपक्ष ४ सदस्य निवडून आले आहेत.
भाजपाच्या या यशामागे पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर मुट्टे, माजी आमदार सीताराम घनदाट, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या संघटित प्रयत्नांचे फळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे व माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा पक्षाला फटका बसल्याची चर्चा आहे.
उबाठासाठी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रविंद्र धर्मे, काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख तसेच शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, सईद खान यांनी जोरदार लढत दिली. मात्र अपेक्षित यश मिळवण्यात या पक्षांना अपयश आले.
एकूणच परभणी जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा झेंडा उंचावला असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये नव्या सत्ताकारणाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.











