Parbhani;जिल्हाअंतर्गत गुरुजींच्या बदल्यांचे आदेश निघाले..!

Spread the love

परभणी, ता.९(प्रतिनिधी) :Z.P.Teacher Transfer News जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक), परभणी यांच्याकडून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीचे आदेश सोमवारी (ता. ८)सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. शासन निर्णय व परिपत्रकांनुसार ऑनलाईन बदली पोर्टलवर पूर्ण झालेल्या प्रक्रियेच्या आधारे हे आदेश काढण्यात आले असून, तब्बल १,८४४ शिक्षकांच्या बदल्या या आदेशाद्वारे निश्चित झाल्या आहेत.या बदल्यांमध्ये २५७ विशेष संवर्ग भाग-१, ९१ विशेष संवर्ग भाग-२, १,४५६ बदलीपात्र शिक्षक आणि ४० बदलीपात्र शिक्षक यांचा समावेश आहे.C O.Nitisha Mathur जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश प्रसिद्ध झाले.

👉रुजू होण्याचे निर्देश

सदर आदेशानुसार संबंधित शिक्षकांना ८ सप्टेंबर रोजी मध्यान्होत्तर कार्यमुक्त करण्यात येणार असून, ९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात नवीन शाळेत हजर होणे बंधनकारक आहे. कार्यमुक्तीच्या वेळी बदली पोर्टलवरून प्राप्त झालेला संगणकीय आदेश जोडणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

👉नियमभंगास शिक्षा

बदली प्रक्रियेत शिक्षकांनी दिलेली माहिती वा सादर केलेली कागदपत्रे चुकीची आढळल्यास शासन निर्णयानुसार शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. तसेच या बदल्यांवर पदग्रहण अवधी वा प्रवास भत्ता मंजूर होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

👉शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खबरदारी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्या शाळेत शिक्षकांची संख्या शून्य होणार असेल, अशा ठिकाणी संबंधितांना गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कार्यमुक्ती दिली जाणार नाही, असे निर्देशही देण्यात आले आहेत. बदली आदेश हा पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचा असून, कोणत्याही शिक्षकाने वा अन्य व्यक्तीने राजकीय दबाव आणल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

👉वेतनाबाबत नियम

बदली झालेल्या शिक्षकांचे त्या महिन्याचे संपूर्ण वेतन जुन्या शाळेतूनच काढले जाणार आहे. मात्र पुढील महिन्यापासून वेतन नवीन शाळेतून दिले जाईल. जर कार्यमुक्तीनंतर जुन्या शाळेतून जादा वेतन निघाले, तर त्याची वसुली केली जाईल. बदली आदेशाची नोंद संबंधितांच्या मुळसेवा पुस्तिकेत घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या आदेशामुळे परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षकांना आता नवीन शाळेत कार्यरत होऊन शैक्षणिक कार्य सुरळीतपणे सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


You cannot copy content of this page