नाथ प्रतिष्ठानचा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार
श्रींची स्थापना; ज्येष्ठ व्यापारी बंडू गरड यांच्या हस्ते सपत्नीक पूजन;संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याचा जीवंत देखावा; धनंजय मुंडेंच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन
परळी वैद्यनाथ ता.२६(प्रतिनिधी) – माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मागील वीस वर्षांपासून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे यावर्षी शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्भूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून, उद्या दुपारी १२.३० वाजता परळी वैद्यनाथ शहरातील ज्येष्ठ व्यापारी बंडू गरड यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून मोंढा परिसरात उभारलेल्या मंडपात श्रींची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.
नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवास राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा आहे, मात्र यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा देखावा तसेच चांगदेव – मुक्ताई भेट, पैठण धर्मसभा असे अत्यंत आकर्षक देखावे साकारण्यात येत असून या देखाव्याचे माजी मंत्री आमदार तथा नाथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ७ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.
श्री गणेश स्थापना तसेच देखावा उद्घाटन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नाथ प्रतिष्ठान चे सर्व सदस्य, तसेच श्री गणेश भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाथ प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.











