धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी…

Spread the love

धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी…

मुंडेंच्या प्रयत्नातून अद्ययावत एक्स-रे मशीन दाखल तर ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात येणार

परळी (दि. 20) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिलेला शब्द पाळला असून, परळी उपजिल्हा रुग्णालयात ना. मुंडेंच्या प्रयत्नातून एचडीएफसी बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर फंड) माध्यमातून अद्ययावत 100 एमए एक्स-रे मशीन आज (बुधवार) दाखल झाली आहे. तर अद्ययावत ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात दाखल होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परळी आणि परिसरातील सामान्य नागरिकांचे विविध तपासण्यांसाठी सुरू असलेले हाल आता थांबणार आहेत.

धनंजय मुंडे यांनी कोव्हिड विषाणू संसर्गाच्या सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापनास बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. कोव्हिड अलगिकरण कक्ष, पीपीई किट आदी विविध सामग्री खरेदी, यांसह जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात व्हेंटिलेटर्स उपलब्धी, एमआर आय मशीन, कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा थेरपी यंत्रणा आदी विविध आरोग्यविषयक बाबी तातडीने उभ्या करून जिल्ह्यातील जनतेला आरोग्य संजीवनी मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत, तसेच कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही.

परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून मृत अवस्थेत होती, तीच परिस्थिती ईसीजी मशीनची देखील होती. सामान्य नागरिकांना अगदी हाताच्या बोटांचा एक्स-रे जरी काढायचा म्हटलं तर खाजगी रुग्णालयात 400 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र आता हा त्रास कायमचा बंद होणार आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी उपजिल्हा रुग्णालयास एचडीएफसी बँकेने त्यांच्याकडील सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) वापरून एक्स-रे व ईसीजी मशीन उपलब्ध करून दिली आहे. एक्स-रे मशीन आज परळीत दाखल झाली असून, ती येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्यात येईल, तर इसीजी मशीन येत्या दोन दिवसात रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे यांनी दिली आहे; तसेच या दोनही अद्ययावत उपकरणांसाठी डॉ. कुर्मे व समस्त उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page