कृषिमंत्र्यांनी बेरोजगारासाठी कुठला उद्योग परळी विधानसभा मतदारसंघात आणला?- राजेसाहेब देशमुख
कृषिमंत्र्यांनी बेरोजगारासाठी कुठला उद्योग परळी विधानसभा मतदारसंघात आणला?- राजेसाहेब देशमुख
कटेंगे-बटेंगे’ सोडा परळीतील समस्यावर बोला- बहादुरभाई
परळी प्रतिनिधी
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहर व विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी कुठला उद्योग आणला. हे परळीतील जनतेला सांगावे. परळी शहर व तालुक्यातील गुंडगिरी, दडपशाही संपवण्यासाठी परळी शहराचा विकास करण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. तर महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परळी शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा झाले आहेत. त्यामुळे येथे सुखाने कोणी जगू शकत नाही. अशी दयनीय अवस्था सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरिबांची झालेली आहे. कटेंगे-बटेंगे’ सोडा महागाईचे बोला, परळी शहरातील समस्यावर बोला असे आवाहन विरोधकांना काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी नेहरू चौक तळ येथील कॉर्नर सभेत केले.
या प्रसंगी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासह वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई, युवा नेते सुनील गुट्टे, नरेश हालगे,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, आदिंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळीतील सर्वसामान्य जनता घराणेशाहीला वैतागून आता बदल घडविण्यासाठी सज्ज झालेली आहे. परळीत ‘तुतारी’ दुमदुमणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ह्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत परळी मतदारसंघाच्या विकासासाठी जाती धर्मावर मतदान न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर आधारित विकास साधून परळीला राज्यातील पहिल्या दहा क्रमांकांमध्ये नेण्याचा माझा दृढ निर्धार आहे. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आणि परळीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले सहकार्य आणि पाठबळाची गरज आहे. मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे असेही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले.
परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून आश्वासनांचे गाजर, आरोग्य सुविधांचा अभाव, बोगस योजनांचा महापूर सुरु आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे. रस्त्यावर नाली आहे की नालीत रस्ता आहे. अशी बकाल अवस्था परळी शहराची झाली आहे. वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचा प्रयत्न विरोधकांचा सुरू असल्याचे काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आपल्याला परळीत सुखाने नांदायचं आहे. या संधीचा फायदा आपण निश्चित घेतला पाहिजे. आमच्या ताटात कोणी माती कालवू नका. आमच्या आम्ही कमावतो आणि आमचं खातो. ते आमच्या आम्हाला खाऊ द्या. परळीत शांतता गुंडगिरी दहशत संपली पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना सर्वांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती