‘देवेंद्र फडणवीस’ महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार; मुंबईत पार पडला शपथविधी सोहळा; पंतप्रधान नरेंद्र मोदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
संपादकीय…..
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. असे म्हणत मुंबई येथील आझाद मैदानावर गुरुवारी ५ डिसेंबर रोजी संध्या ५.३० वा.पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली . महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी महायुतीने साकारलेल्या देवेंद्र पर्व ३.० ची अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. जल्लोषात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि १८ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महायुती आणि भाजपच्या मित्रपक्षांचे नेते, संत-महंत, विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित होते.
नवमहाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मी पुन्हा येईन, अशी ग्वाही देणारे फडणवीस यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला लक्षवेधी यश मिळवून दिल्यापासूनच मुख्यमंत्रीपदी सर्वांचे लाडके देवाभाऊच विराजमान होणार, अशी चर्चा सुरू होती. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी फडणवीस, शिंदे , पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिल्यावर गेले काही दिवस सुरू असलेल्या या चर्चेवर औपचारिकपणे शिक्कामोर्तब झाले.देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण केले. तसेच भक्कम पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचे आभारही मानले.यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.देवेंद्र फडणवीस, शिंदे , पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केले. यावेळी मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा देत त्यांची पाठ थोपटली.
अपेक्षा आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीने, जोमाने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर फडणवीस यांनी प्रशासनाला केल्या आहेत. गेल्या अडीच वर्षांत प्रगतीपथावर सुरू झालेली महाराष्ट्राची वाटचाल आता अधिक गतीने आणि धोरणात्मक निर्णय घेत सुरू राहील. आमच्या कामाची दिशा बदलणार नाही, अशी ग्वाही त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली.