परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती
परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती
परळी…. प्रतिनिधी…परळी शहराचे सुपुत्र व ज्येष्ठ न्यायिक अधिकारी श्री. कृष्णगोपाल श्रीनिवास तोतला यांची महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य (Judicial Member) म्हणून नियुक्ती झाली आहे. महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने २२ मे २०२५ रोजी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ही नियुक्ती महाराष्ट्र भू-राजस्व संहिता, १९६६ च्या कलम ३११ (१) व कलम ३२५ अंतर्गत करण्यात आली आहे.
श्री. तोतला यांनी न्याय क्षेत्रात २८ वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर कार्य करत न्यायदानाची उज्वल परंपरा पुढे नेली आहे. जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश व धर्मादाय आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या १२ जिल्ह्यांना लाभ होणार असून, या विभागातील न्यायप्रक्रिया अधिक परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तोतला यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.