जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वरद लांडगे प्रथम; शाळेत गौरव समारोह संपन्न
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वरद लांडगे प्रथम; शाळेत गौरव समारोह संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…
येथील न्यू हायस्कूल शाळेचा कर्तृत्ववान विद्यार्थी चि. वरद श्रीराम लांडगे (वर्ग ८ वी) याने आपल्या उत्तुंग कामगिरीने शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर प्रकारात वरदने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असून आता तो होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे
याबाबत माहिती अशी की; शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बीड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रेस्ट स्ट्रोक ५० मीटर प्रकारात वरदने अविश्रांत मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, हा क्षण संपूर्ण शाळेसाठी आणि पालकांसाठी अभिमानाचा ठरला आहे. वरदचे यश हे त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे व खेळावरील प्रेमाचे फलित आहे. या स्पर्धेसाठी त्याला न्यू हायस्कूलचे क्रीडा शिक्षक वानखेडे सर, स्विमिंग कोच संजय भगत, गणेश मुंडे, वैजनाथ वेरुळे, रमेश चाटे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी क्रीडा विभागाचे हौसळकर सर, एस एफ आय चे सचिन मंजुळे, शैलेश चव्हाण आदींनी वरदला पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
न्यू हायस्कूल शाळेत गौरव समारंभ संपन्न
चि. वरद श्रीराम लांडगे यांने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव माननीय आमदार सतीशभाऊ चव्हाण तसेच शालेय समिती परळी वैजनाथचे अध्यक्ष नानासाहेब (काका) सोळंके यांनीदेखील कौतुक व्यक्त केले असून त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यू हायस्कूल शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे, के. व्ही., पर्यवेक्षिका सौ. छाया देशमुख, क्रीडा शिक्षक श्री. नारायण वानखेडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. शहापूरे सर अमर देशमुख सर व शिंदे डी. एम. सर आदीनी त्याचा सत्कार केला. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सहाध्यायी व क्रीडा प्रेमी यांनी वरदचा सत्कार करत त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.वरदच्या या कामगिरीमुळे शाळा, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधान व अभिमान व्यक्त होत असून विभागीय स्तरावरील त्याच्या सहभागाबाबत सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.












