धनंजय मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली अन 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर
धनंजय मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली अन 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर
शुक्रवार पासून परळीच्या ग्रामीण रुग्णालयात होणार सुरू
परळी (दि. 22) —- : परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य सह अन्य यंत्रणा कामाला लावून 48 तासात परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभा केले आहे. हे कोविड केअर सेंटर उद्या शुक्रवार (दि. 23) पासून कार्यान्वित होणार आहे.
परळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व इतरांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडली.
दरम्यान या 50 बेडच्या व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, यांपैकी 20 बेड उद्या (दि. 23) रोजी तर उर्वरित 30 बेड येत्या दोन दिवसात रुग्णांसाठी उपलब्ध होतील. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांनी दिली आहे.
परळीत सध्या समाज कल्याण विभागाच्या दोन वस्तीगृहामध्ये मिळून सौम्य व लक्षणे नसलेल्या 200 पेशंटची सोय करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील सात डॉक्टरांनी आपल्या खाजगी रुग्णालयात करोना पेशंटवर उपचार सुरू केले आहेत.
श्री. धनंजय मुंडे यांनी शहरातील डॉक्टरांची ही नियमित संवाद ठेवून या संकटात जास्तीत जास्त सेवा द्यावी असे आवाहन डॉक्टरांना केले आहे.