आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या निर्दयी मात्या पित्याचा प्रताप;धावत्या ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक फेकले

Spread the love

पाथरी-सेलू महामार्गावरील प्रकार;दोघांविरुद्ध पाथरी पोलीसांत गुन्हा दाखल

परभणी ता.१७(प्रतिनिधी)
एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात अर्भक फेकल्याचे निदर्शनास येताच उपस्थितांनी पोलिसांना पाचारण केले. ही घटना पाथरी – सेलू राष्ट्रीय महामार्गावर देवनांद्रा शिवारात मंगळवारी (ता.१५) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकासह दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, एका १९ वर्षीय तरूणी व २१ वर्षीय तरूणाने अंतरजातीय प्रेम विवाह करून एकत्र राहत होते. ते पुणे येथे कामाला होते. दरम्यान पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत असतांना पाथरी – सेलू दरम्यान देवनांद्रा शिवारात तरूणीने नवजात पुरूष जातीचे अर्भक चालत्या ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकले. शेतात काम करणार्‍या एका व्यक्तीने हे पाहताच ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरिक्षक महेश लांडगे, पोलिस हवालदार विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. ट्रॅव्हल्सचा शोध घेतला असता गाडी सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हल्सचा शोध लावला. प्राथमिक चौकशी केली असता प्रवासादरम्यान तरुणी प्रसुत झाली मात्र अर्भक मृत असल्याने ते ट्रॅव्हल्सच्या खिडकीमधून बाहेर फेकल्याचे संबंधित तरूणाने सांगितले.

-पोलिसांची तत्परता; आरोपींना बजावली नोटीस

अल्ताफ मेहनुद्दीन शेख आणि ऋतिका मिलिंद ढेरे दोघे राहणार परभणी मागील दीड वर्षापासून पुणे येथील चाकण येथे एकत्र राहत होते. दरम्यान ऋतिका ढेरे हिला दिवस गेले. मंगळवारी(दि.१५)पुणे – परभणी प्रवासात चालत्या ट्रॅव्हल्समध्ये ऋतिका प्रसुत झाली. जोडप्याने संगनमताने नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्समधून फेकून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला असून हे पुरुष जातीचे अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश लांडगे, सहायक पोलिस निरीक्षक एस. डी. नारके, सहायक पोलिस निरीक्षक स्वामी, पोलिस उपनिरीक्षक शेख माजिद, पोलिस कर्मचारी विष्णू वाघ, हवालदार एस. एन. लोखंडे, पी. एस. थोरे, बाळासाहेब कदम यांनी घटनेचा तात्काळ छडा लावत दोन तासात आरोपी जोडप्याला ताब्यात घेतले. आरोपी महिला नुकतीच बाळंत झाल्याने तिला पुढील उपचारार्थ परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या आरोपीला पाथरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.याप्रकरणी पोलिस हवालदार अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून ऋतिका मिलिंद ढेरे आणि अल्ताफ मेहनुद्दीन शेख या दोघांविरुद्ध नवजात अर्भकाची जबाबदारी नाकारल्याने आणि अर्भकाची गुप्त विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page