पाथरीतील महसूल सेवक गेले संपावर..!
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची ठाम मागणी
पाथरी ता.२२ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत पाथरी तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी सोमवार (दि.२२ सप्टेंबर) पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ केला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
पाथरी तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. महसूल सेवक संपावर गेल्याने गावपातळीवरील ई-पिक पाहणी, महसूली कामकाज तसेच महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा उपक्रमातील कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या संपामुळे महसूल विभागाशी निगडित अनेक कामांवर ताण येणार असून शेतकरी व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. सातबारा, नकाशे, प्रमाणपत्रे, पिक पाहणी यांसारख्या सेवा ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी महसूल सेवकांनी पाथरी तहसीलदारांना निवेदन सादर केले. त्यात “मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहील” असा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनामुळे प्रशासनाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर बाधित होत असून शासन यावर तातडीने निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.