परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा भरतीत घोटाळा झालायं -सहकारमंत्री पाटलांची कबुली

Spread the love
  • अनुकंपा नियुक्त्यांबाबत चौकशी समिती; महिनाभरात अहवाल

परभणी, ता.२८ / प्रतिनिधी

परभणी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथे मोठ्या प्रमाणात नियमबाह्य भरती झाल्याची बाब राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात शुक्रवारी (दि.२७) मान्य केली. या संदर्भात राजेश विटेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यासोबतच विजय वडेट्टीवार आणि प्रशांत बंब यांनीही या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.

उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, बँकेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निवृत्तीपूर्व काही वर्षे शिल्लक असतानाच स्वतःला वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य ठरवणारी कथित बनावट प्रमाणपत्रे सादर केली. त्या आधारे स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या जागी वारस किंवा इतर व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्याबाबत सहकार विभागाने पत्र पाठविल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली. नागपूर अधिवेशनात या प्रकरणाची चौकशी जाहीर करण्यात आली होती; मात्र संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहकार विभागाचे उपनिबंधक यांनी चौकशीस अपेक्षित सहकार्य केले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

आता या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पुणे येथील निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.दरम्यान, निवृत्तीनंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर का कार्यरत आहेत, यासह विविध मुद्द्यांवर अनेक आमदारांनी सभागृहात प्रश्नांची सरबत्ती करत सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली.

You cannot copy content of this page