रेती उपसा करणा-या ट्रॅक्टरसह किनीयंत्र जप्त
पूर्णा-कौडगांव पांदण रस्त्यावर डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांची संयुक्त कारवाई
पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)
डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांनी कौडगांव पांदण रस्त्यावर अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी शनिवारी २१ रोजी पहाटे छापेमारीची संयुक्त कारवाई करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर, केनी, चालक व मालक यांचे विरुध्द कलम३०३(२),३(५)भान्यासं सहकलम ४८(७)(८) गौण खनिज कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या कौडगांव पांदण रस्त्यावरील पुर्णा नदीपात्रात ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांना मिळाली.या माहीती आधारे त्यांनी पुर्णा पोलीस ठाण्याचे फौजदार श्रीनिवास पडलवार, पोकाॅ.भानुदास राठोड,पोकाॅ.बायनेवाड, पोकाॅ.टाकरस,पोकाॅ.शेंबेवाड यांना कार्यवाही करीता पाठवले.पथकाने कदम गल्ली ते कौंडगाव कडे जाणा-या पांदण रोडवर मुळे यांचे शेताजवळ ट्रॅक्टर व केनीचे साहाय्याने विनापरवाना बेकायदेशीर रित्या वाळुचा उपसा करत असताना छापा घालून सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर तसेच २ लाख रुपये किंमतीची किनीयंत्र ताब्यात घेतले.दरम्यान पोलीसांचे पथक घटनास्थळी येत असल्याची कुणकुण लागताच वाळू उपसा करणा-यांनी घटनास्थळांवरुन पोबारा केला.पोलीस पथकाने जप्त केलेले साहित्य पुर्णा पोलीस ठाण्यात जमा करुन पोकाॅ.भानुदास राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर व किनीयंत्र चालक व मालकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.तपास पुर्णा पोलीस करत आहेत.