सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड..
परभणी जिल्ह्यातील कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात घडली घटना;ताडकळस पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पूर्णा(ताडकळस)/प्रतिनिधी:
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात काही तरुणांमध्ये आप आपसात लागलेली भांडणे सोडवणा-या बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी ता.२८ रोजी रात्री घडल्याचे उघडकीस आले असून घटनेत भांडखोर तरुणांनी सहाय्यक पोलिस निरीक्षका गजानन काठेवाडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा येथून जवळच असलेल्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळगाव येथील एका खासगी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मंगळवार २८ जानेवारी रोजी काही तरुणांनी एकमेकांशी भांडण करून तुंबळ हाणामारी केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. यात सपोउपनि. गजानन काठेवाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना परभणी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे., कळगाव येथील एका खासगी विद्यालयात मंगळवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केला होता. हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना उपस्थित काही तरुणांनी एकमेकांशी भांडण सुरू करून मारहाण केली. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले सपोउपनि. गजानन काठेवाडे, पोलिस हवालदार मारोती कुंडगीर, महिला पोलिस खिल्लारे यांनी भांडण सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिस आहेत हे माहीत असून ही आरोपींनी शासकिय कामात अडथळा निर्माण केला. तसेच सपोउपनि, काठेवाडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले, तसेच पोलीसांना खतम करून टाकु अशी धमकी देऊन जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक काठेवाडे यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घेऊन जात असताना देखील अटकाव केला. याप्रकरणी पोलिस हवालदार मारोती कुंडगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तब्बल १६
जणांसह व अन्य आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ ते ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत काळे, ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रशेन देशमुख यांच्यासह विशेष पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे करीत आहेत.