पूर्णा शहरात ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन’ दिनाचे आयोजन

Spread the love

पूर्णा, ता.१(प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून सुरू केलेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पूर्णा शहरात (ता.२) ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पयावंश आणि भदंत पय्यासार करणार आहेत.

सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तहसीलदार रामराव बोथीकर यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण होईल. त्यानंतर सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता बुद्ध विहार पूर्णा येथे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.

दुपारी बारा वाजता बुद्ध विहार येथे सामूहिक रत्नवंदना व पूजा विधीनंतर महामानव भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची सजविलेल्या रथातून शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढली जाईल. ही मिरवणूक आंबेडकर चौकात दाखल झाल्यानंतर भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर धम्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे असणार असून प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विकास कदम, उपविभागीय अधिकारी गंगाखेड युवराज डापकर व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी इंजि. डॉ. भीमराव हटकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, महिला मंडळ तसेच धम्म सेवेत कार्यरत कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page