पोस्ट ऑफिसच्या जीर्ण इमारतीवरून पुर्णेत काँग्रेसचा ‘जन सत्याग्रह’ चा इशारा
कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व मूलभूत सेवांचा अभाव; CPMG मुंबई यांना तातडीची मागणी
पूर्णा ता.६(प्रतिनीधी) : तालुक्यातील पूर्णा पोस्ट कार्यालयाच्या धोकादायक व जीर्ण इमारतीसह कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा नसल्याने परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाने प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल (CPMG), मुंबई यांना पत्र पाठवून काँग्रेसने या गंभीर प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:
- पोस्ट ऑफिससाठी नवीन इमारतीच्या बांधकामाला निधी मंजूर करणे.
- कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करणे व रिक्त पदे भरणे.
- AePS, बचत योजना व आधारसंबंधित सेवा त्वरित सुरू करणे.
- नागरिकांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था व दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करणे.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘जन सत्याग्रह आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, पांडुरंग कदम, अब्दुल सलीम, विठ्ठल कापुरे आदींनी दिला आहे.
स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची ही आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरत असून, आता पोस्टल प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.