अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करा पुर्णा काँग्रेसचे निवेदन
पूर्णा ता.७( प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.याबाबत तहसीलदार पुर्णा यांच्यामार्फत केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे.
गेल्या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस अशा खरिपाच्या प्रमुख पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तब्बल ३१.९८ लाख हेक्टरवरील शेती बाधित झाली असून, अनेक ठिकाणी अपेक्षित पावसाच्या १०७ टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अंदाजे १.४ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून, कर्जबाजारी शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. याशिवाय पीकविम्याची मदतही मिळाली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टरी ₹६०,००० इतक्या दराने विशेष आर्थिक पॅकेज त्वरित मंजूर करावे,शेतकऱ्यांच्या विद्यमान कर्जफेडीस स्थगिती देऊन नव्या कर्जासाठी विशेष तरतूद करावी,वीजबिल आणि शेतसारा माफ करावा.या मागण्या १५ दिवसांत मान्य न झाल्यास पूर्णा तहसील कार्यालयासमोर ‘जन-सत्याग्रह आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.परभणी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निखिल दिगंबरराव धामणगावे यांनी दिलेल्या निवेदनावर प्रल्हाद पारवे (तालुकाध्यक्ष, पूर्णा तालुका काँग्रेस कमिटी), पांडुरंग कदम (शहर उपाध्यक्ष), रफीक सर,विठ्ठल कापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.