चोरट्यांनी ऐन बाजार पेठेतील दोन दुकाने फोडली;२.५ लाखांहुन अधीक मुद्देमाल पळवला
पुर्णा ता.२५(प्रतिनिधी)
शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी एका सुवर्णकाराच्या दुकानासह किराणा दुकानास आपले लक्ष बनवत सुमारे अडीच लाखांहुन अधीक मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी (ता.२४) रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले असुन,पुर्णा पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा शहरात मुख्य बाजारपेठेतील महात्मा बसवेश्वर चौकात कैलास टाक यांचे न्यू स्नेहल ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान तर किंग्ज काॅर्नर परिसरात बाबु संचेती यांचे कापसे किराणा दुकान आहे.रविवारी सायं दोन्ही दुकानदारांनी दिवसभर आपला व्यवसाय करुन रात्री घरी गेले.अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री कैलास टाक यांचे दोन्ही दुकानाचे शटर वाकून आत प्रवेश करत सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने तसेच दुकानातील सिसीटीव्हीचे डिव्हीआर चोरून नेला.बाबु संचेती यांचे किराणा दुकानाचे ही शटर त्याच पद्धतीने वाकून आत प्रवेश करत व काजू, बदाम, साबण व इतर मौल्यवान साहित्य असा सुमारे ३० हजारांचा किराणा मालाची चोरी केली.सोमवारी पहाटे काही नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच दुकान मालकांना ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती पुर्णा पोलीसांना देताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पो.उप.नि.श्रीनिवास पडलवार, वाल्मीक भोसले व इतर पोलीस कर्मचा-यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला.पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोरट्यांचा भाग काढण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते.ऐन बाजारात सदर घटना घडल्याने पूर्णा शहरातील व्यापारी वर्गामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांचे पोलीसांना आवहान..?
मागील काही दिवसांपासून शहरात चोरटे सक्रिय झाले आहेत.दुचाकी चोरी सह बंद घरास चोरटे लक्ष बनवत आहेत.शहरातील पंचशील नगर,विजय नगर भागातील चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी पुर्णा पोलीसांना खुले आवहान देत शहरातील ऐन बाजार पेठेत एक सराफा व किराणा दुकान फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल पळवला आहे.त्यामुळे रात्र गस्तीवर असलेले बीट मार्शल, कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.












