पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या अजयचा मृतदेह १८ तासांनी आढळला
कानखेड गावात हळहळ; शोकाकुल वातावरणात अंत्यविधी;पोलीसांत घटनेची नोंद
पूर्णा/प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अजय वैद्य या ११ वर्षीय बालकाचा मृतदेह तब्बल अठरा तासांनी बुधवारी ता.७ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बाॅम्बे पुलाजवळ आढळून आला असून,घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा नदीवरील रेल्वे पुल तसेच कानडखेड जवळील बाॅम्बे पुलाच्या मधोमध असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात अशोक वैद्य यांचे दोन्ही मुले अजय व पांडुरंग हे शेळ्या चारण्यासाठी मंगळवारी सकाळी पूर्णा नदीच्या काठावर गेले होते.दरम्यान ईतर मुले नदीपात्रात पोहत असल्याचे पाहून तेही दोघेही पोहण्यासाठी नदीत उतरले.दरम्यान पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सिद्धेश्वर जलाशयातुन सोडलेले पाणी आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने अजय पाण्यात बुडत असताना पांडुरंग त्यास वाचवण्यासाठी धडपडत होता परंतु तोही पाण्यात बुडत होता.नदीकाठावर असलेल्या बाबुराव नरहरी लांडे यांनी हा प्रकार पाहताच थेट नदीपात्राकडे धाव घेऊन नदीपात्रात उडी घेत या दोन्ही मुलांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु यास वाचून असताना यश आले परंतु अजय हा त्यांच्या हाताला लागला नाही.मंगळवारी दिवसभर आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसह कानडखेड येथिल ग्रामस्थांसह तरुणांनी त्याचा शोध घेतला होता परंतु तो कोठेही आढळून आला नाही.१८ तासांनी बुधवारी सकाळी त्याचा ६ वाजण्याच्या सुमारास पुलाजवळ नदीपात्रात त्याचा मृतदेह गावातील तरुणांना आढळून आला.घटनेप्रकरणी जमादार रमेश मुजमुले यांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पो.नि.गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुजमुले करत आहेत.