पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या कारभाराचे वाभाडे
दुमजली वस्तीगृहात शिरले पाणी ; वार्डनने मुलींना पाण्यात जेवायला भाग पाडले; निष्काळजीपणामुळे संतापाची लाट
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) : पूर्णा शहरातील शासकीय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या कारभारातील ढिसाळपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेले नव्याने दुमजली वस्तीगृह पावसाच्या पाण्याने पोखरले. पावसाचे पाणी शिरून मुलींचे बेड, कपडे, पुस्तके, साहित्य सर्व भिजले असतानाही वार्डनने मुलींना पाण्यातच जेवायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुलींची दुर्दशा – जबाबदारांचा निष्काळजीपणा
११ ते १६ वर्षे वयोगटातील २५० ते ३०० मुली या वस्तीगृहात वास्तव्यास आहेत. या मुलींपैकी बहुतांश पालकाविना आहेत. शासनाने त्यांना सुरक्षित आश्रय व दर्जेदार शिक्षणाची हमी दिली होती. मात्र, शुक्रवारी (ता.१२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वस्तीगृहात पाणी शिरले. विद्यार्थिनींना सुरक्षित दुसऱ्या मजल्यावर हलविण्याऐवजी वार्डननेच त्यांना पाण्यात बसवून जेवायला भाग पाडले. या अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला.

मुख्याध्यापिका नांदेडला – मुलींचा कारभार रामभरोसे.?
येथील मुख्याध्यापिका श्रीमती राऊत या नांदेड येथून ये-जा करतात. काही शिक्षक परभणी व गंगाखेडहून येतात. अशा परिस्थितीत वसतीगृहातील दैनंदिन कारभार व मुलींची काळजी घेणारा जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी नसल्याने विद्यार्थिनींना सतत त्रास सहन करावा लागत आहे. दोन महिला वार्डन असूनही विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे पालकांनी सांगितले.

पत्रकारांची प्रत्यक्ष पाहणी – अधिकाऱ्यांचे मौन.!पत्रकार सुशील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असता संपूर्ण वस्तीगृहात पाणी साचलेले होते. मुलींनी सांगितले, “पाणी इतके वाढले की झोपण्याची जागा नव्हती, जेवण करणेही कठीण झाले. अधिकारी कुणीही मदतीला आले नाहीत.” पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली आणि समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

स्थानिक प्रशासनाचा आढावा – पण जबाबदारी कुणाची?
घटनास्थळी नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अशोक पारवे व सहकाऱ्यांनी तातडीने पाणी काढून टाकले. पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी वसतीगृहाला भेट देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. मात्र, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी या गंभीर प्रकारावर मौन बाळगले.

पालकांचा संतापपालकांकडून तीव्र संताप.. व्यक्त करत कारवाईची मागणी.
- वस्तीगृहात तातडीने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- जबाबदार मुख्याध्यापिका व वार्डन यांच्यावर कठोर कारवाई करावी.
- प्रत्येक पावसाळ्यात वारंवार घडणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
विद्यार्थिनींच्या जिवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात कठोर भूमिका न घेतल्यास पालक व नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.












