अबब.. दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळला.!
पुर्णा तालुक्यातील मरसुळ शिवारातील घटना; नांदेडच्या सर्पमित्रांनी दाखवली शिताफी
पूर्णा ता. २७ (प्रतिनिधी);तालुक्यातील मौजे मरसुळ शिवारात सोमवारी (ता. २७) सायं सात वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली. शेतकऱ्याच्या आखाड्याजवळ वळवळणारा हा अजगर पाहताच ग्रामस्थांची अक्षरशः धांदल उडाली.
शेतकरी रावसाहेब मोहनाजी कदम यांना त्यांच्या शेतातील कालव्याजवळ हा प्रचंड सर्प दिसला. भीतीने थरथरलेल्या कदम यांनी तत्काळ गावचे सरपंच गणपत शिंदे व ग्रामस्थांना धाव घेऊन कळविले. काही क्षणांतच अंबाजी शिंदे, उत्तम कदम, माधव शिंदे, अंकुश लोखंडे, वैभव कदम, गजानन भारती, कृष्णा शिंदे, गणेश कदम, आकाश शिंदे, ज्ञानेश्वर कदम यांसारखे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
परिस्थिती गंभीर होत असल्याने सरपंच गणपत शिंदे यांनी नांदेड येथील प्रसिद्ध सर्पमित्र रघुवीर बकाल व विशाल गिरी यांना तातडीने फोन करून मदतीस बोलावले. सर्पमित्र सायं साडेआठ वाजण्याच्या सुमारास मरसुळ येथे दाखल झाले आणि थरारक कारवाई करत मोठ्या शिताफीने अजगराला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश मिळवले.
पकडलेला अजगर अंदाजे दहा फूट लांबीचा आणि सुमारे १२ ते १५ किलो वजनाचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्यानंतर या अजगराला त्यांनी निर्मनुष्य ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात सोडले, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजगर पकडल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी एकच सुटकेचा निःश्वास टाकला.











