धक्कादायक;विहिरीत आढळला तरुण विवाहितेचा मृतदेह
पूर्णेतील बरबडी येथील घटना;हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण..
पूर्णा(प्रतिनिधी)
गावालगतच्या शेत शिवारातील एका विहिरींमध्ये २३ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना दि.४ डिसेंबर २०२४ रोज बुधवारी तालुक्यातील मौजे बरबडी शिवारात घडल्याचे उघडकीस आले असून,घटनेने एकच खळबळ उडाली असून,सदरील महीलेची हत्या झाली का.? तीने आत्महत्या केली.? या चर्चेला उधाण आले आहे.घटनास्थळी पूर्णा पोलिसांची टिम दाखल झाली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.
राणी हनुमान शिंदे (वय २३)वर्ष रा.बरबडी ता.पूर्णा असं मयत नवविवाहितेचे नांव आहे.येथिल हनुमान शिंदे या तरुणाबरोबर सदरील विवाहीतेचा गत तीन ते चार वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.बुधवारी ४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गावालगत शेती असलेल्या ग्रामस्थ बालासाहेब शिंदे यांच्या गट नंबर ११४ मधील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत एका विवाहीतेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना निदर्शनास आला.यामुळे गावात सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली.घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.सदरील महीला कोण आहे.तीने आत्महत्या केली का तीची कोणी हत्या केली या चर्चेला उधाण आले होते.दरम्यान ग्रामस्थांनी सदरील बाब पूर्णा पो.नि.विलास गोबाडे यांना कळवली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील,पो.नि.विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले,सपोउपनि. आमेर चाऊस यांनी धाव घेऊन पहाणी केली.ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विहरीतील मृतदेहाची ओळख पटवून घेतली.विहीरीत भरपूर पाणी असल्याने तब्बल सहा ते सात तासांनी मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.वृत्त लिही पर्यंत घटनेप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात कोणताही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याचे समजते.