वाळू वाहतूक करणारा हायवा नायब तहसीलदारांनी पकडला..
पूर्णेत गुरुवारी मध्यरात्री प्रशांत थारकर यांची कारवाई;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; अडीच लाखांचा ठोठावला दंड
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील आदर्श काॅलनी भागात वाळू घेऊन जाणारा एक हायवा टिप्पर पूर्णा महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाने शुक्रवारी २८ रोजी मध्यरात्री पकडला आहे. कारवाईत सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेल्या वाहनास तहसीलदारांनी अडीच लाखांचा दंड ठोठावला असल्याची माहिती आहे.
पूर्णा शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतूकीवर लगाम घालण्यासाठी पूर्णा महसूल प्रशासनातील सिंगम नायब तहसीलदार यांनी कंबर कसली आहे.उपविभागीय अधीकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी २७ रोजी रात्री गस्तीवर होते.मध्यरात्री २;१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील आदर्श काॅलनी भागात गस्तीवर असलेल्या नायब तहसीलदार प्रशांत थारकर,मुरली मोरे, नंदकिशोर शेलाटे यांनी एक वाळूने भरलेले हायवा टिप्पर वाळू खाली करण्यासाठी जात असताना पथकाने टिप्परला अडवले त्यांनी टिप्पर चालकास वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्यांच्या कडे परवाना नसल्याने उडवाउडवीची उत्तरे देत वाहनातील चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पथकाने सदरील २५ लाख रुपयांचे हायवा टिप्पर ५ ब्रास वाळू सह जप्त केले असून जप्त करण्यात आलेले वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे .या प्रकरणी तहसिलदार बोथिकर यांनी हायवास अडीच लाखांचा दंड ठोठावला आहे.
पूर्णा पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात मंगळवारी वाळू उपसा करणा-या जेसीबी व ट्रॅक्टर पकडून गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी मध्यरात्री कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी एक विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडल्याने एका पाठोपाठ एक होत असलेल्या कारवाई मुळे वाळू माफीयांत एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे.