अन्नधान्याऐवजी थेट रक्कम शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यात
जमा होणार एक कोटी वीस लाखाची रक्कम
पूर्णा- पूर्णा तालुकयातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतक-यांच्या नावे सातबारा आहे व ज्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून कुटुंबातील महिलांच्या नावे असलेल्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच थेट रक्कम हस्तांतरणद्वारे अन्नधान्यापोटी मिळणारी रक्कम जमा करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला आहे.
पूर्णा तालुक्यातील एकूण ७३३८ कार्डधारक व लाभार्थी सदस्यसंख्या ३१३८३ इतकी असून त्यापैकी एकूण ५४२५ शिधापत्रिकांमधील एकूण २३६६७ इतक्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल-२०२४ ते जून-२०२४ या कालावधीतील प्रतिसदस्य १७० याप्रमाणे एकूण १२०,७०,१७०/- (एक कोटी वीस लाख सत्तर हजार एकशे सत्तर) इतकी अनुदानाची रक्कम मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली असून मंजुरी मिळताच सदर रक्कम लवकरच कार्डधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
तसेच ज्या उर्वरित १९१३ शेतकरी शिधापत्रिकाधारकांना अद्याप सदर योजनेअंतर्गत लाभमिळालेला नाही अशा लाभार्थ्यांनी आपले कुटुंबाचे राशन कार्ड, कुटुंबसदस्यांचे आधार कार्ड, महिला कुटुंब प्रमुखाचे नावे असलेले बैंक पासबुक या कागदपत्रांच्या छायांकित प्रत व मोबाईल क्रमांकासह स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे अथवा पुरवठा विभाग तहसील कार्यालय, पूर्णा येथे जमा करण्याबाबतचे आवाहन तहसीलदार श्री. माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार श्री. सतीश नाईक पुरवठा निरीक्षक श्री. प्रदीप मोरे यांनी केले आहे.