पूर्णा शहरात बंदी असलेल्या औषध, गोळ्यांची विक्री.!

Spread the love

नवतरुण व्यसनाच्या आहारी;ड्रग्स इन्स्पेक्टरांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.! विभागीय औषध निरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी

पूर्णा(प्रतिनिधी)|२२ जानेवारी २०२५. जिल्हा ड्रग्स इन्स्पेक्टर यांनी पूर्णा तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरासह तालुक्यात काही औषध विक्रेत्यांकडून शासनाने बंदी घातलेल्या औषध गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे पहायला मिळत आहे.या औषध विक्रीच्या गोरख धंद्यातून व्यवसायीकांची चांदी होत असेलही परंतु जिल्हा औषध निरीक्षकांच्या लापरवाहीमुळे मात्र गोरगरीब,मध्यमवर्गीय नवतरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याने चित्र आहे.मानवी जिवाशी खेळ करत असलेल्या ड्रग्स इन्स्पेक्टर व औषध विक्रेत्यांवर विभागीय निरीक्षकांनीच आता कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
पूर्णा शहरासह तालुक्यात जवळपास १०० ते १२५ औषध विक्रेते आहेत.यातील काही विक्रेते या व्यवसायातून रग्गड पैसा कमावण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून चक्क फार्मासीस्टची पदवी नसतानाही फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून मासीक मोबदला देऊन त्यांच्या औषध विक्रीच्या परवान्यावर दुकानदारी करत आहेत. औषध विक्री करण्यासाठी फार्मसीस्ट दुकानात असणं बंधनकारक आहे .मात्र हा नियम पायदळी तुडवून रुग्णांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे.
मागील काही दिवसांपासून शहर व परिसरातील काही औषध विक्रेत्यांकडून नशेसाठी वापर होत असलेली शासनाने बंदी घातलेली औषधे, तसेच रात्र गरम करण्याची प्रतिबंधक असलेली औषधे जादा दराने विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे.नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे कोणत्याही डाॅक्टरांच्या प्रिस्क्रीपशन नसताना ही नशेची लत करणाऱ्या व्यक्तीला तीन ते चार पट जादा दराने विक्री केली जात आहेत.तर काही जणं नशेची औषधे विक्री करण्यासाठी बाहेर गावांहून पूर्णा शहरात येऊन औषध विकत असल्याचे देखील बोलले जात आहे.
हा प्रकार शहरासह तालुक्यात खुलेआम पद्धतीने सुरू आहे.या सर्वांवर करडी नजर ठेवण्यासाठी शासनाने औषध निरीक्षकांना नियुक्त केले आहे.मात्र येथिल औषध विक्रेत्यांची व औषध निरीक्षकांचे कानाला कान लागल्याचे सर्वश्रृत असल्यामुळेच की काय औषध निरीक्षकांना पूर्णा तालुक्यातील औषध दुकानांची तपासणी करण्यासाठी वेळच मिळत नसावा असे म्हणने वावगं ठरणार नाही.हा सर्व प्रकार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हा औषध निरीक्षकांशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क करुनही उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांचे या प्रकाराबाबत नेमके काय मत आहे हे समजू शकले नाही.


विभागीय औषध निरीक्षकांनी लक्ष द्यावे..

पूर्णा शहरात मागील काही दिवसांपासून नशेच्या गोळ्या,औषध सेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामूळे लहान सहान कारणां वरून भांडणं तंडे चाकुहल्ल्या पर्यंत वाद विवाद होताना दिसत आहेत. जिल्ह्यातील औषध निरीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावर अंकुश राहिला नसल्याने प्रतिबंधात्मक औषधांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. सुरु असलेल्या प्रकार थांबविण्यासाठी विभागीय औषध निरीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page