Purna Panchayat Samiti Scam;बिडीओ श्रीमती वानखेडे, मोडकेसह ७ ठग फरार तर पाठक,भिसे न्यायालयीन कोठडीत
पूर्णा पंचायत समितीतील १ कोटी ८४ लाख रुपयांचे पेन्शन घोटाळा प्रकरण; अपहारकर्ते पोलीसांना सापडेनात
पूर्णा / प्रतिनिधी
येथिल पूर्णा पंचायत समितीतील नुकत्याच उघडकीस आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, भविष्य निर्वाह निधीमध्ये १ कोटी ८४ लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले दोन गटविकास अधिकारी श्रीमती सुनीता वानखेडे व जे.व्ही.मोडके यांच्यासह ७ जण गुन्हा दाखल झाल्या पासून,पसार झाले आहेत, यातील मुख्य सुत्रधार घोटाळ्यातील मुख्य दोषी लेखापाल संजय पाठक व सहाय्यक लेखापाल मंचक भिसे या दोघांना गजाआड करण्यात पूर्णा पोलिसांना यश आले. याप्रकरणी मा.पूर्णा न्यायालयाने दोघांची बुधवारी १५ रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दोघांच्या आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत आरोपींकडून पोलीसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे उर्वरित ७ जणांना पोलीस आता कधी ताब्यात घेणार याची एकच चर्चा पूर्णा तालुक्यात रंगली आहे.
पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये सन २०२१ ते २०२३ दरम्यान येथे कार्यरत असलेल्या लेखापाल, सहाय्यक लेखापाल,तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या संगणमताने जवळपास २ कोटी रुपयांचा पेन्शन घोटाळा झाला.या घोटाळ्याची व्याप्ती जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली. त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर तब्बल ९ आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली चार ते पाच गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तात्काळ लेखा अधिकारी संजय पाठक सहाय्यक लेखापाल मंचक भिसे यालाही पूर्णा पोलिसांनी गजाआड केले.ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना बुधवार (दि.१५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या आठ दिवसांत पोलीसांना प्रकरणात महत्दत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे समजते.दरम्यान, बुधवारी मा.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मात्र या प्रकरणातील मुख्य काही आरोपी तत्कालीन गटविकास अधिकारी श्रीमती सुनीता वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे.व्ही मोडके हे अद्यापही फरार आहेत. तर या प्रकरणांमध्ये सदर घोटाळ्यातील लेखापाल संजय पाठक व वरिष्ठ सहाय्यक लेखापाल मंचक भिसे यांनी तात्कालीन दोन बीडीओ यांच्या सोबत संगणमत करुन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन भविष्य निर्वाह निधीतील लाखों रुपयांच्रया रक्कमा तालुक्यातील काही अन्य लोकांच्या नावे टाकून शासनाच्या तिजोरीतील जवळपास पावणे दोन कोटींच्या वर डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. पूर्णा ,नावकी, सुहागन येथील काही जणांची नावे आरोपी म्हणून पुढे आले आहेत. परंतु ते अद्यापही फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून जवळपास २ कोटीच्या वर घोटाळ्याचा आकडा गेला असुन अजुनही काही जणं दोषी असल्याचे बोलले जात आहे.