पत्रकारांवर हल्ला;पुर्णेच्या पत्रकारांची कठोर कारवाईची मागणी
अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुर्णा शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पूर्णा ता.२१(प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर टोलवसुली करणाऱ्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पूर्णा शाखेने जाहीर निषेध केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी (दि.२१) पूर्णा पोलिसांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.पत्रकार योगेश खरे, किरण ताजणे, अभिजीत सोनवणे व अन्य दोन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याला ‘लोकशाहीवरील थेट आघात’ असे ठपके ठेवत, हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवावेत, अशी ठाम मागणी परिषद शाखेने केली आहे.
पत्रकारांवरील हल्ले हा प्रकार वारंवार घडत असून त्याला आळा बसावा यासाठी संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका निवेदनात नमूद करण्यात आली.या निवेदनावर तालुका अध्यक्ष मुजीब कुरेशी, कार्याध्यक्ष गजानन हिवरे, सचिव अनिस बाबुमिया, शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांच्यासह म.अलीम, जगदीश जोगदंड, दौलत भोसले, विजय बगाटे, सुशिल गायकवाड, सुशिल दळवी, अनिल आहीरे, संपत तेली, अमृत क-हाळे, केदार पाथरकर, शेख असद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच पत्रकारांची एकमुखी मागणी आहे.












