पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातील रोडला अतिक्रमणाचा विळखा; महीला छेडछाडीच्या घटना;गुन्हेगारी वाढली; पोलीस व पालीकेचे दुर्लक्ष

Spread the love

पूर्णा ता.१० (प्रतिनिधी) : पूर्णा रेल्वे स्थानक परिसर नागरिकांसाठी अक्षरशः त्रासदायक ठरत असून, अतिक्रमण, अनधिकृत व्यवसाय, दारू व मांस विक्री यामुळे या परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. स्टेशनच्या कंपाउंड लगत मुख्य गेटपासून अष्टभुजा देवीकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जवळजवळ बंदच झाला असून दोन पदरी रस्ता आता फक्त पायी चालण्या इतकाच उरला आहे.रस्त्यावर उघडपणे मांस विक्री होत असून, दिवस-रात्र मद्यपींचा मुक्त संचार चालू आहे. या भागातून जाणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना दिवसा देखील असुरक्षिततेची जाणीव होत असल्याने अनेकजण लांबचा पर्यायी मार्ग वापरण्यास बाध्य आहेत. कुटुंबासह जाणे धोकादायक बनले असून महिलांवरील छेडछाडीच्या घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
नियमबाह्य परवानग्यांचा प्रश्न परिसरातील अनेक हॉटेल, बार, वाईन शॉप व देशी दारूचे अड्डे वेळेपूर्वी उघडत असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत. या दुकानांना पार्किंगची सुविधा नसतानाही नगरपालिका नियमबाह्य पद्धतीने परवानगी देत असल्याचा आरोप होत असून, त्या परवानग्या रद्द कराव्यात अशी मागणी होत आहे. सकाळ-संध्याकाळ परिसरात घाण वास येत असल्याने नागरिकांचे जेवण देखील विस्कटते, अशी तक्रार समोर आली आहे.

गुन्हेगारीत वाढ;पोलिसांचा कानाडोळा….! रेल्वे स्थानक परिसर हा हळूहळू गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी करून प्रवाशांना अडवून व्यवसाय सुरू ठेवला आहे. स्थानिकांनी अनेकदा पोलिस ठाणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाविषयी लोकांमध्ये नाराजी आहे.

नागरिकांची मागणी…. अतिक्रमण, अनधिकृत व्यवसाय व गुन्हेगारीवर तात्काळ नियंत्रण आणून रस्ता मोकळा करावा, नियमबाह्य परवानग्या रद्द कराव्यात आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page