Purna Railway Station धावत्या रेल्वेत महीलेची प्रसूती; डॉ. करवंदे ठरले देवदूत!
पूर्णा स्थानकावरील घटना;भगत की कोठी एक्सप्रेस मधील प्रकार;नवजात बालिकेसह आई सुरक्षित
पूर्णा,ता.१२( प्रतिनिधी) – purna railway station News “डॉक्टर म्हणजे देवदूत” हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरला तो पूर्णा रेल्वे स्थानकावर! धावत्या रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थितीची माहिती मिळताच रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल करवंदे यांनी वेळ न दवडता तातडीने धाव घेतली आणि रेल्वेतच महिलेची यशस्वी प्रसूती करून दाखवली.
नेहमीप्रमाणे Bhagatki kothi Express भगत की कोठी एक्सप्रेस शुक्रवारी ता.१२ रोजी पूर्णा रेल्वे स्थानकावर दाखल झाली. या गाडीत राजस्थानमधील एक गर्भवती महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत चालल्याने प्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला कळविले.

डॉक्टरांची तातडीची धावपळ
घटनेची माहिती मिळताच रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल करवंदे तातडीने स्थानकावर दाखल झाले. महिलेची तपासणी करून वेळेचे गांभीर्य लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये नेण्याइतका अवधी नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घेत रेल्वे डब्यातच प्रसूती केली.

सुखरूप प्रसूती, कौतुकाची लाट
डॉ. करवंदे यांच्या धाडसामुळे व कौशल्यामुळे काही क्षणातच महिलेने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. आई व मुलगी दोघींनाही योग्य वैद्यकीय उपचार करून सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या यशस्वी कार्यामुळे प्रवाशांसह संपूर्ण पूर्णा शहरात कौतुकाची लाट पसरली आहे.
“पूर्णेचे रॉन्चो” ठरले डॉ. करवंदे…
वैद्यकीय सेवेत नेहमी तत्पर असलेले डॉ. कपिल करवंदे यांची ही कामगिरी पाहता त्यांना “पूर्ण्याचा रॉन्चो” म्हणत गौरवले जात आहे. वेळेवर दाखवलेले धाडस, सेवा भाव व जबाबदारीची जाण या सर्व गुणांनीच त्यांनी “डॉक्टर म्हणजे देवदूत” या वाक्याला न्याय दिला आहे.











