पुर्णा तालुक्यात १० वीच्या परीक्षेला अडीच हजार विद्यार्थी
११ केंद्रांवर परीक्षा सुरू; ३३ बैठे व ४ फिरते पथक तैनात, १४४ कलम लागू
पुर्णा, ता.२१ (प्रतिनिधी): राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून, पुर्णा तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर एकूण २ हजार ५२२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने व्यापक तयारी केली आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक देखरेख ठेवण्यात आली असून ३३ बैठे पथके आणि ४ फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे ११५ पर्यवेक्षक, ११ केंद्र संचालक आणि २२ सहाय्यक केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय दंड विधान कलम १४४ लागू केले असून त्याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ३० ते ४० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
महसूल, पोलीस, पंचायत समिती आणि शिक्षण विभागाचे संयुक्त पथक परीक्षा कालावधीत केंद्रांना भेट देत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी दिली. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात कावलगाव, ताडकळस, कात्नेश्वर, एरंडेश्वर, धनगर टाकळी तसेच पुर्णा शहरातील विद्या प्रसारणी शाळा, अभिनव विद्या विहार, संस्कृती महाविद्यालय आणि इंदिरा गांधी विद्यालय येथे परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी पाच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध आहे; मात्र उर्वरित सहा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा नसतानाच परीक्षा सुरू झाली आहे, ही बाब लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी आणि उर्दू विषयाच्या पेपरला एकूण ४१ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच, प्रशासनाच्या कडक नियोजनामुळे परीक्षा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.










