पूर्णा तहसील कार्यालयात शुक्रवारी सस्ती अदालत;शेत,पांदण रस्त्यांचा होणार न्यायनिवाडा
पूर्णा/प्रतिनिधी
- शेतरस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासंबंधी शुक्रवार, दि. 9 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता तहसील कार्यालयात न्याय निवाडा करण्यासाठी सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अतिक्रमित रस्त्यांबाबतचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढली जाणार आहे. तरी शेतकरी, नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होणाऱ्या बहुतांश तक्रारी या शेतरस्ते, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याकरीता जलदगतीने प्रकरणाचा निपटारा व्हावा व सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकअदालतीच्या धर्तीवर सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी तसेच संबंधित नागरिकांना न्याय मिळणार आहे.
दि. 9 मे रोजी सकाळी 10.00 वा. सस्ती अदालत उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व संबंधित शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सस्ती अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, असे तहसीलदार पूर्णा श्री माधवराव बोथीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.