पूर्णा ते झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था..
जागोजागी आका-या, खड्डे यामुळे अपघात वाढले;सा.बां विभागाचे दुर्लक्ष
पूर्णा (प्रतिनिधी)
हट्टा-झिरोफाटा-पूर्णा-धनगरटाकळी फाटा राज्य महामार्ग क्र.२४९ वर मोठ्या प्रमाणात जागो जागी आका-या(डांबर खचुन भेगा ) खड्डे पडल्याने या मार्गावर दुचाकी चार चाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पाच ते सहा वर्षांपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सा.बां.विभागाने वेळीच लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
झिरोफाटा ते पूर्णा राज्य महामार्ग क्रमांक २४९ हा मार्ग तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून रस्ता परभणी नांदेड वसमत या मार्गाला जोडलेला असून तालुक्यातील एरंडेश्वर, कात्नेश्वर,माटेगांव, आहेरवाडी आदीं मोठ्या गावांसह पूर्णा शहरातून नांदेड,पालम,तसेच राज्यमार्ग क्र.६१ ला तसेच संभाजीनगर -नांदेड-निर्मल रस्त्याला जोडला जाणारा प्रमुख रस्ता आहे.मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ता अनुदान विकास निधीतुन या रस्त्याचे काम दोन टप्प्यांत करण्यात आले होते.मागील काही दिवसांमध्ये रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गेल्याने जागोजागी आका-या, खड्डे पडले आहेत.याकडे स्थानिक सा.बां विभागाने दुर्लक्ष केले असुन अपघाताचे प्रमाण वाढले जात आहे.
पूर्णा झिरो फाटा रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये जा करतात. मात्र मागील वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था सुरूच असून, आता ती चक्क जीवघेणी बनली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, डांबर उखडून गेल्यामुळे संपूर्ण मार्ग उखडल्यासारखा झाला आहे.वाहनधारकांना रोज खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता म्हणजे थेट मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की, एखादा नवखा चालक खड्ड्यांमध्ये गाडीसह गाडला गेला तरी नवल नाही!
अपघातांचे वाढते प्रमाण – जबाबदार कोण?
या रस्त्यावरील खड्डे हे लहान-मोठ्या अपघातांना जबाबदार ठरत आहेत. अलीकडेच एका दुचाकीस्वाराचा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे तोल जाऊन अपघात झाला. अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही संबंधित प्रशासन गप्प का.?
प्रशासन झोपलेलं की मुद्दाम दुर्लक्ष?
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांची या प्रश्नाकडे असलेली उदासीनता म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. जनतेच्या कराच्या पैशातून विकासकामं केली जातात, मग या रस्त्यावर दुरुस्ती का नाही? सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पूर्णा झिरो फाटा रस्त्याची दुरावस्थेत लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे याकडे तात्काळ कारवाईची मागणी या रस्त्याच्या डागडुजीसाठी नागरिक, वाहनधारक, व्यावसायिक आणि विद्यार्थीवर्ग यांच्याकडून एकमुखाने मागणी केली जात आहे. जर तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही, तर आंदोलनाचा मार्ग पत्करला जाईल, असा इशाराही नागरिकांतून दिला जात आहे.