नांदेड रेल्वे विभागात घोटाळ्यांची मालीका ;डिझेल घोटाळ्या नंतर आता रेल्वेरुळ चोरी घोटाळा..!
वडगांव निळा स्थानकावरील लाखों रुपयांचे रुळ चोरीला;चोरीत रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसह चार ते पाच जणांचा समावेश;रेसुबलासमोर आवहान
पूर्णा (प्रतिनिधी)
नांदेड रेल्वे विभागात एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे प्रकरण उघडकीस येत आहेत.येथिल तथाकथित कोट्यावधी रुपयांच्या डिझेल चोरी घोटाळ्यातील जवळपास आरोपी ताब्यात येता न येताच आता पुन्हा एकदा रेल्वेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनेच गंगाखेड स्थानकाजवळील वडगाव निळा येथील लाखों रुपये किंमतीच्या रेल्वे रुळावर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, परभणी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती आहे.याप्रकरणी रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त आरोमासिंह ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणी झाडाझडती घेतली आहे.
या चोरीच्या तपासासाठी तीन पथके तैनात केली आहेत.तरीही या घोटाळ्याचा संपूर्ण पर्दाफाश करण्यासाठी विशेष उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातील २३ रोजी झालेल्या या प्रकरणात एका आरोपीला २१ फेब्रुवारीला आरपीएफ पथकाने ताब्यात घेतले तर घटनेतील आणखी चार ते पाच आरोपीस पसार असुन मुख्य आरोपी रेल्वे सुरक्षा बलाच्या हातावर तुरी देऊन मुख्य आरोपी आजाराचे कारण पुढे करून हैदराबादमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात विविध स्थानकांच्या दरम्यान जुने रेल्वे रूळ बदलून तेथे नवीन रूळ टाकण्याचे काम मागील काही महिन्यांत सुरू आहे. याच दरम्यान वडगाव निळा स्थानकाजवळ स्टॉकमध्ये ठेवलेले रेल्वे रूळ गायब झाल्याचे प्रकरण घडले. यामध्ये परभणी आरपीएफ ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरपीएफ पोलिसांकडून परभणी, परळी, जालना, नांदेड अशा ठिकाणी चौकशी करून तपास सुरू होता. यामध्ये रेल्वेतील अधिकाऱ्याचा समावेश असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पोलिसांनी हा तपास सुरू केला. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. बी. कांबळे, नांदेड सीआयडी यासह विशेष पथक तपासासाठी निश्चित केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला गंगाखेडला शेख रशीद यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. हायड्रा व साहित्य पुरवठा करणाऱ्या शेख रशीद याच्या माध्यमातून पुढील तपास पोलिसांनी केला. आता चार ते पाच आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
पूर्णा सेक्शनअंतर्गत रेल्वेच्या परभणी, परळी मार्गावरील रेल्वे अभियंता म्हणून जबाबदारी असलेल्या एम. सतीश बाबू याचाही यात आरोपी म्हणून समावेश असल्याचे आरपीएफ पोलिस निरीक्षक एस. बी. कांबळे यांनी सांगितले. एम. सतीश बाबू हा हैदराबादला रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. या संदर्भात आरपीएफने सदरील रुग्णालयातसुद्धा कर्मचारी तैनात करून रेल्वेच्या डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे सतीश बाबू याला ताब्यात घेतल्यावर पुढील तपास करणे सोपे होणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.