चोरट्यांनी बाजार समिती संचालकांचे दुकान फोडले..!
पूर्णेच्या नवा मोंढयातील घटना;७ क्विंटल हळदीची चोरी
पूर्णा ता.७(प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील बाजार समिती संचालकाच्याच आडत दुकानाला चोरट्यांनी लक्ष बनवत दुकानाचे कुलूप तोडुन शटर वाकून सुमारे एक लाख रुपये किंमतीची १३ पोते हळद चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्या नंतर बाजार समीतीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात दि.७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णेतील कृउबासमीतीच्या यार्डात बाजार समितीचे संचालक तथा आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदाणी तसेच शिवप्रसाद मोदाणी या बंधुंचे पवन ट्रेडींग कंपनी नावाचे आडत दुकान आहे.शनिवारी ता.५ रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते.दरम्यान रविवारी मोंढा बाजार बंद असल्याने त्यांचे दुकान बंद होते.सोमवारी सकाळी दुकानात काम करणाऱे मुनीम दुकान उघडण्यासाठी आले असता.त्यांना दुकानाच्या शटरचे कुलुप तसेच शटर वाकवल्याचे दिसुन आले.ही घटना मुनीमांनी मालकांना कळवली. दुकान फोडल्याचे निदर्शनास येताच दुकान मालक शिवप्रसाद मोदाणी यांनी आपले बंधू डॉ जयप्रकाश मोदाणी यांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत सांगितली.तातडीने पो.नि.विलास गोबाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत.घटनेचा पंचनामा केला.घटना यार्डातील काही दुकानांच्या सिसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे समजते.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात शिवप्रसाद मोदाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध १३ कट्टे हळद पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास पूर्णा पोलीस करत आहेत.
———————————————-
सिसीटीव्ही बंद सुरक्षा वा-यावर..
कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्डमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त ,बंद अवस्थेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची यंत्रणा असतानाही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे वेळोवेळी कर भरूनही, त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा व सुरक्षितता पुरवली जात नसल्याची तीव्र नाराजी व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.प्रशासनाने तत्काळ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी व्यापारातून होत आहे.












