अबब..चोरट्यांनी पळवली ३ लाखांची अॅल्युमिनियम तार
चुडावा वसमत रोडवर सुरू आहे महावितरणचे वाहीन्यांजोडीचे काम;अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल..
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील वसमतफाटा ते पांढरी दरम्यान महावितरण कंपनीकडून वाहीन्यांजोडणीचे काम करत असलेल्या एका कंत्राटदाराच्या साहित्यावरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे ३ लाख रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची तार चोरुन नेल्याची घटना बुधवारी १६ जानेवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा तालुक्यातील चुडाव्यापासुन जवळच असलेल्या वसमतफाटा ते पांढरी दरम्यान महावितरण कंपनीच्या वतीने ११ केव्ही विद्युत वाहीन्यां जोडणीचे काम नांदेड येथिल कंत्राटदार मंगेश मुंजाजीराव उदासे हे करत आहेत.त्यांनी सदरील कामांकरिता वसमत फाटा ते पांढरी मसोबा मठ (वारकरी शिक्षण संस्था) दरम्यान काम सुरू असल्याने परिसरात अल्युमिनियमच्या तारा, कंडक्टर खांब आदीं साहित्य आणले होते.दि.९ जानेवारी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या साहित्यातील ५५ sq.mm जाडी असलेली ७ हजार ७४० मीटर लांबीची सुमारे २ लाख ८१ हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची तार चोरट्यांनी पळवून नेली आहे.त्यांनी याप्रकरणी चोरी झालेल्या तारेचा शोध घेतला परंतु तार मिळून न आल्याने त्यांनी चुडावा पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी एक फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात गुरनं ९/२०२५ कलम ३०२(२) भा.न्या.सं कायद्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंह पोमनाळकर,पो.उप.नि.मुखेडकर यांच्या सह पोकाॅ. बनसोडे,पोकाॅ.हानवते यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.तपास पो.उप.नि.मुखेडकर करत आहेत.