पूर्णा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

Spread the love

पूर्णा ता.६ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचा भव्य कार्यक्रम पूर्णा येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला.

सायंकाळी पाच वाजता विद्या प्रसारिणी सभेची शाळा, पूर्णा येथून पथसंचलनास सुरुवात झाली. शिस्तबद्ध गणवेशातील स्वयंसेवकांचा हा संचलन निघाल्यानंतर शहरातील विविध मार्गांवर नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने संचलनाचे जोरदार स्वागत केले. संचलनाचा समारोप श्रीराम मंदिर येथे करण्यात आला.

यानंतर शस्त्रपूजनाचा पारंपरिक विधी पार पडला. त्यानंतर झालेल्या विजयादशमी उत्सवाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्री. ज्ञानेश्वर बोकारे, संचालक-स्वराज अकॅडमी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वटवृक्षाप्रमाणे समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असून, समाज परिवर्तनाच्या प्रत्येक प्रक्रियेत संघाचे योगदान महत्त्वाचे आहे.”

प्रमुख वक्ते श्री. रुपेश यादव, विभाग प्रचारक यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले की, “भारत देशाला परमवैभवाच्या दिशेने नेण्याचे कार्य संघच करीत आहे. समाजाला सुसंघटित करणे, संघशक्ती निर्माण करणे आणि त्या बळावर देशाला परम वैभवाच्या शिखरावर पोहोचवणे हेच संघाचे ध्येय आहे.” तसेच त्यांनी संघाचा इतिहास, त्यागशील कार्यपद्धती आणि संघशक्तीचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला.

या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक, नागरिक तसेच माता-भगिनी उपस्थित होत्या. पथसंचलनाची शिस्तबद्ध मांडणी, शस्त्रपूजनाचे औचित्य आणि विचारप्रवण मार्गदर्शनामुळे विजयादशमी उत्सव संस्मरणीय ठरला.

You cannot copy content of this page