श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन
सुप्रसिद्ध भाजीच्या महाप्रसादाचे मुख्य आकर्षण;पालखी सोहळ्यासह आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; निकाली कुस्त्यांची दंगल
पूर्णा/ प्रतिनिधी
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथील सजगीर महाराज, रामगीर महाराज, देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन महंत आशिषानंद महाराज,नारायणगीर महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, यात्रेनिमित्त दि.२३ ते ३० मार्च दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् संगीत भागवत कथा,हरी जागर,पालखी सोहळा तसेच भव्य भाजीच्या महाप्रसादासह निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सजगीर महाराज देवस्थान समीतीच्या वतीने देण्यात आली.
२३ ते २९ मार्च दरम्यान दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवमहापुराण कथाचे आयोजन करण्यात आले असून कथाकार म्हणून संतोषानंदजी शास्त्री (श्रीजीधाम) उपस्थित राहणार आहेत.
महोत्सव काळात दररोज रात्री ८ ते १० या वेळेत नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. यात २३ मार्च रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख, २४ मार्च रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भालेराव, २५ मार्च रोजी ह.भ.प. सुरदास महाराज रायवाडीकर, २६ मार्च रोजी आचार्य कृष्णचैतन्य स्वामी पुरी, २७ मार्च रोजी ह.भ.प. अर्पिता ताई कांगणे हंडीकर, २८ मार्च रोजी ह.भ.प. लक्ष्मणजी महाराज झेंडे, २९ मार्च रोजी ह.भ.प. विजय महाराज गवळी तर ३० मार्च रोजी ह.भ.प. दशरथ महाराज आंबोरे यांचे कीर्तन होणार आहे. ३० मार्च रोजी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री ११ नंतर गोंधळ व हरिजागर कार्यक्रम होणार आहे. तसेच ३१ मार्च रोजी स. ९ ते दु. ४ या वेळेत जंगी निकाली कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.हजारों रुपयांची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भाजी भाकरीचा (महाप्रसाद) होणार आहे.
या महोत्सवाला खा. संजय उर्फ बंडू जाधव,आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती शिवानंद महाराज व महंत नारायणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त गावकरी मंडळी, आहेरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे .











