संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी
परभणीत हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन
परभणी ता.२१(प्रतिनिधी)
पंढरीत आषाढीला भरणाऱ्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी मजल दर मजल करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत.विदर्भासह हिंगोली जिल्ह्यातून जाणा-या शेंगांची संत गजानन महाराजांच्या पालखी नंतर नर्सीचे संत श्री नामदेव महाराजांचा पालखी सोहळा ही पंढरीच्या वाटेवर आहे.परभणीत शनिवारी (ता.२१) दुपारी ४वाजण्याच्या सुमारास या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.यावेळी परभणीकरांनी ठिक-ठिकाणी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
हिंगोली जिल्हयातील श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथून दरवर्षी श्रीसंत नामदेव महाराज यांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुराकडे रवाना होते. यंदाही ही पालखी नरसी नामदेव येथून निघून औंढा – नागनाथ शिरड शहापूर – जवळा बाजार – झिरो फाटा मार्गे परभणी शहरात शनिवारी दुपारी दाखल झाली. शुभ्रवस्त्र परिधान केलेले भाविक, वारकरी हातात टाळ, मृदंग आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठू नामाच गजर करीत पायी चालत आषाढी एकादशीच्या पुर्वसंंध्येला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचते. संत नामदेव महाराजांच्या या पालखी समवेत हजारो वारकरी, महिला, पुरूष आणि आबाल वृध्द पालखी सोबत पायी चालत जवळपास महिन्याभराच्या पदयात्रेनंतर पुढील महिन्यात येणार्या आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात.
परभणी शहरात पालखी, वारकर्यांचे आगमन होताच जागोजागी स्वागत करण्यात आले. दरम्यान हजारो भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तर पालखी मार्गात अनेक ठिकाणी वारकरी, दिंडीकरी आणि भाविकांसाठी पाणी, फराळ, बिस्कीट आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
__________