परभणी;सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पूर्णा बंद
अत्यावश्यक सेवा वगळता बंद यशस्वी;सकल मराठा समाज संघटनांचा आक्रमक पवित्रा
पूर्णा(प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या व त्यांची पाठराखण करणा-यांना सहय आरोपी करावे या मागणीसाठी पूर्णेत सकल मराठा समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत शनिवारी ८ रोजी बंद पुकारला.अत्यावशक सेवा वगळता पूर्णा बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यापार पेठ दिवसभर बंद राहिली.
मागील दोन महिन्यांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व यास जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे या मागणीसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरुवार रोजी पूर्णा शहर बंद पुकारण्यात आला होता. यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळ पासूनच व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवत बंद मध्ये सहभाग घेतला.शहरात बंद दरम्यान शाळा , महाविद्यालय , रुग्णालय,औषधी दुकाने आदीं सेवा सुरू होत्या . सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख अमर रहे,खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना आरोपी करावे अशा घोषणा सह आरोपींच्या निषेधार्थ घोषणा देत प्रशासनाला निवेदन सादर केले. पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी यांच्या कडे निवेदन सादर केले. यावेळी मराठा समाज बांधव व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विलास गोबाडे व सहकारी पोलीसांच्या वतीने शहरातील झिरो टिपॉईंट, आनंदनगर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरात जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.












