शक्तीपीठ महामार्गाविरोधात सिंगणापूर फाट्यावर ‘रास्ता रोको’
खा.संजय जाधव आक्रमक;शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध; सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलन
परभणी/प्रतिनिधी :
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या वतीने सोमवारी (ता.२३) सकाळी ९ वाजता सिंगणापूर फाटा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन शिवसेना उपनेते व परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
परभणी तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. शासनाने मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करत महामार्ग उभारणीची प्रक्रिया पुढे नेली आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींची मोजणी होणार होती. या मोजणीविरोधात शेतकऱ्यांनी शांततामय आंदोलनाचा इशारा दिला होता.
प्रत्यक्ष मोजणीदरम्यान परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा तसेच सोनपेठ तालुक्यातील कोठाळा शिवार येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. मात्र आंदोलनकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करत गुन्हे दाखल केले. महिला आंदोलकांवरही गुन्हे नोंदविल्याने संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी व शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी सिंगणापूर फाटा येथे सोमवारी सकाळी ९ वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे. शेतकरी संघटना, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी, तसेच विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्यासाठी सर्व स्तरांतील नागरिक, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, गंगाप्रसाद आणेराव तसेच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले आहे.










